टाकळीवाडी - येथील रेणुका देवीचे महात्म्य कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर पुर्वेस शिरोळ तालुक्यात आहे . टाकळी हे गाव . काही शतकापूर्वी कृष्णा नदीला महापूर आल्याने तेथील ग्रामस्थांनी स्थलांतर केले व या स्थलांतरीत गावालाच टाकळीवाडी असे नामाभिधान प्राप्त झाले . याच गावच्या अग्नेयेस रेणुका देवीचे मंदिर असून गावचे ग्रामदैवत असलेल्या या देवीला कोणत्याही शुभकार्याप्रसंगी कौल लावला जातो . मंदिराची देखरेख व देवीची नित्य पूजा अर्चा अनेक वर्षांपासून बस्तवाडे कुटुंबियांच्यामार्फत केली जाते . पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्यातून मंदिराच्या 25 गुंठे आवारात संरक्षण भिंत , पाण्याचा हौद , कुपनलिका , भक्तांसाठी हॉल , गेट यासाठी सुमारे 7 लाख रुपयांचा निधी उभा करून ही कामे पूर्ण केली आहेत . या मंदिराच्या पूर्ण इतिहासावर नजर टाकली असता अतिशय प्राचीन असे सुप्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आले . देवीला मानणारा भक्तगण मोठा असल्याने यात्रेला कोल्हापूर , सांगली , सातारा , बेळगांव , जिल्ह्यातून लाखो भक्त येतात . भक्तगणांना नवसाला पावणारी ही देवी श्री रेणुका देवी (यल्लम्मा) म्हणून प्रसिद्ध आहे . इ.स. 1600 मध्ये सौ. सखुआई या रेणुका देवीच्या उत्कट भक्त होत्या . त्या मुळच्या टाकळीवाडीच्या कन्या असून त्यांचे सासर शिरढोण हे आहे . लग्नानंतर त्यांना बरेच वर्षे संतती प्राप्ती नसल्याने त्या टाकळीवाडी गावी परत आल्या . अपत्यप्राप्तीसाठी त्या यल्लम्मा डोंगराला (सौंदत्ती) पायी चालत जात होत्या . अशा बऱ्याच वाऱ्या त्यांनी केल्या . एकदा त्या डोंगराहून परत येत असताना रात्र झाली व जवळपास गाव नसल्याने त्यांना भीती वाटू लागली व एकटी कशी जाणार ? आपले काय होईल ? यासंबंधी डोक्यात विचारांचे थैमान सुरु झाले व रेणुका देवी सौ. सखुआईच्या भक्तीमुळे प्रकट झाली . पण रस्त्यातून जाताना मी डोंगराची देवी तुझ्या पाठीशी आहे व तुझ्या सोबत येत आहे . याची जाणीवही सौ. सखुआईला होऊ दिली नाही . टाकळीवाडीच्या अग्नेय दिशेला येताच देवीने तिचे स्वरूप प्रकट करून सौ. सखुआईला दाखविले व तिला मीच रस्त्यात तुझ्या पाठीशी येत होते . याचीही जाणीव करून दिली व माझा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहिल , असे सांगून ती अदृश्य झाली . त्याच ठिकाणी देवीची मुर्ती उभी असून सुंदर मंदिर बांधले आहे . त्या ठिकाणी दरसाल विशाल यात्रा व वेगवेगळे औचित्य साधून पालखीची मिरवणूक निघते . देवी सौ. सखुआईच्या स्वप्नात जाऊन साक्षात्कार दिला व देवी बोलली की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले असून मी तुला ज्या ठिकाणी दर्शन दिले , तिथे तू माझे छोटेशे मंदिर बांध . तेव्हा सौ. सखुआई स्वतः च्या संचित धनातून इ.स. 1605 मध्ये देवीचे मंदिर बांधले . मुख्य मंदिराच्या बरोबर समोर पूर्व दिशेला प्राचीन विहीर आहे . ही मुर्ती कोणीही कारागीराने बनविलेली नसून भक्तीला प्रसन्न झाल्याने स्वयंभू स्वरूपातील आहे . ही मुर्ती म्हणजे साक्षात अतिशेच होय . साक्षात अतिशेच म्हणजे तुम्ही शुद्ध , शुचिर्भूत होऊन मुर्तीसमोर बसून एखादा नवस बोलला तर आपली मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणजे साक्षात अतिशेच मुर्ती होय .







